बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
पोलीस तपासावर न्यायालयाचे ताशेरे

सोलापूर
पुरुषोत्तम दिगंबर बन्ने वय- 47 राहणार – उत्तर कसबा, पत्रा तालीम सोलापूर यास जीवे ठार मारल्या प्रकरणी व एकावर प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी शांतप्पा यशवंत आडके वय 61, सागर शांतप्पाआडके वय 29, विजयकुमार शांतप्पाआडके वय 32, महादेव सदाशिव ढबाले वय 33, अमित आप्पासाहेब आडके वय 29, अजित आप्पासाहेब आडके वय 32 सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब यांच्यासमोर होऊन त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, यातील मयत पुरुषोत्तम बन्ने याने आरोपी शांतप्पाआडके याचे कडून बाळे येथील शेत जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीबाबत दोघांनीही न्यायालयात प्रोनाउन्सेशन दिवाणी दावे दाखल केले होते.
जमिनीबाबत वाद असल्यामुळे मयत पुरुषोत्तम बन्ने याने शासकीय मोजणी आणली होती.दि 21.6.2024 रोजी शेत जमीन मोजणी करता शासकीय अधिकारी मोज्जे बाळे येथील शेतामध्ये आले असता आरोपी शांतप्पाआडके, सागर आडके,बाळू आडके हे हातामध्ये कोयता व लोखंडी रोड घेऊन आले यांना आज सोडायचे नाही म्हणून शांतप्पाआडके याने कोयत्याने पुरुषोत्तम यांच्या डोकीत दोन्ही हातापायावर कमरेवर शरीरावर वार करून जखमी केले.
तसेच सागर व बाळू आडके यांनी लोखंडी पाईप ने पुरुषोत्तम यास मारहाण केली. त्यावेळी पुरुषोत्तम चा भाऊ देविदास हा त्यास वाचवण्यासाठी मध्ये गेला असता शांतप्पाआडके याने उसात लपलेल्या सात ते आठ जणांना बोलावून घेतले व त्यांनी दोघांनाही मारहाण करून पळून गेले. मयताच्या भाऊ देविदास याने 100 व 112 नंबर वर पोलिसांना फोन केला.
मयतास उपचार अर्थ प्रथम सिद्धेश्वर हॉस्पिटल त्यानंतर वळसंकर हॉस्पिटल येथे दाखल केले असता दिनांक 23 6 2024 रोजी पुरुषोत्तम हा मयत झाला. घटनेबाबतची फिर्याद मयताचा भाऊ देविदास दिगंबर बन्ने याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सरकारतर्फे एकंदर 16 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यात एकंदर 4 नेत्र साक्षीदारांचे जबाब नोंदविले
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात फिर्यादीने सुरुवातीस अज्ञात लोकांची व नंतर उशिराने दिलेले फिर्यादीत आरोपींची नावे घेतली आहेत.घटनास्थळ हे मोजणीच्या ठिकाणी नसून दुसऱ्याच्या शेतात दाखविले आहे. ओळख परेड विश्वासार्ह नाही. पोलीस तपासात अनेक त्रुटी आहेत असे मुद्दे मांडले. त्यावरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड .मिलिंद थोबडे, ॲड .अभिजीत इटकर, ॲड .विनोद सूर्यवंशी ॲड दत्ता गुंड तर सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.



