अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस २० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा

सोलापूर
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरूणास विशेष न्यायाधीश जे जे मोहिते यांनी २० वर्षे सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजकुमार सायबु खेत्री (वय २३, रा. रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पीडित आणि आरोपी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. ते मोबाईल फोनवरून संवाद साधत असत. ८ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास आरोपी राजकुमार याने पीडितेला अंबाबाई मंदिराच्या जवळ बोलावले आणि त्यानंतर तिला मोटरसायकलवरून आपल्या घरी नेले. त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. आरोपी राजकुमार याने तिच्याशी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, त्याने तिला तिच्या घरी सोडले. पुन्हा ११ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास पिडीतेला अंबाबाई मंदिराच्या जवळ बोलावले आणि मामाच्या शेतात नेले आणि तिथेही त्याने तिच्यावर संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केला. ३१ डिसेंबर २०२० रोजी पीडिता आणि तिच्या आईमध्ये घरकामावरून भांडण झाले. पीडितेने आरोपी राजकुमार यास याबद्दल माहिती दिली. १ जानेवारी २०२१ रोजी आरोपी राजकुमार याने पिडीतेला पुन्हा अंबाबाई मंदिराजवळ बोलावले आणि त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात, मग साईबाबा मंदिरात आणि पुढे कर्नाटक राज्यातील आगरखेड येथील एका गावात नेले. ही सर्व घडलेली घटना पीडितेने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादवरून पोलीसांनी आरोपीविरूध्द बलात्कार तसेच पोक्सो कायदयानुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजकुमार यास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बाय एस गायकवाड यांनी गुन्हयाचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वतीने बचावासाठी २ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस २० वर्षांचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाबिली.
या खटल्यात सरकारच्यावतीने अॅड. कबिता बागल, अॅङ . शितल डोके व अॅड . एस.एस. क्यातम यांनी तर आरोपीतर्फे अॅड ए. एन. शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती एस.एस. घाडगे यांनी काम पाहिले



