खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उद्या सोलापुरात; ऐतिहासिक भीम मिरवणुकीत होणार सहभागी…
शहर व जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठी तयारी....

सोलापूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात निघणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी लोकसभेचे खासदार आणि संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे उद्या, १९ एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होऊन ते महामानवाला अभिवादन करणार आहेत. डॉ. शिंदे यांचे उद्या संध्याकाळी ५ वाजता सात रस्ता परिसरात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठी तयारी केली आहे.
शिवसेनेच्या वतीने सात रस्ता येथे भव्य स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली असून, संध्याकाळी ५ वाजेपासूनच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूरच्या या गौरवशाली परंपरेत सहभागी होण्यासाठी शिंदे साहेब येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.



