श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ह.भ.प.शिवलाल महाराज यांच्या दिव्य सानिध्यात श्रीकृष्ण अध्यात्मिक मठात भक्तिमय गुलाल सोहळा

.
सोलापूर (प्रतिनिधी)
महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील श्रीकृष्ण अध्यात्मिक मठ सेटलमेंट फ्री कॉलनी चव्हाण वस्ती परिसरातील श्रीकृष्ण मठात जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भक्तिमय गुलाल सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला गुलाल सोहळ्याच्या प्रारंभी संपूर्ण सेटलमेंट परिसरातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ‘गोविंदा’च्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नगर प्रदक्षिणेदरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यास १०३ वर्षीय ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित भक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला प्रेम, भक्ती, कर्म, सत्य आणि धर्माचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. भक्तीमध्ये श्रद्धा आणि आचरणामध्ये सदाचार असेल, तर जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी श्रीकृष्ण भगवान यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच ह.भ.प.शिवलाल स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित भक्तगणांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या जन्माष्टमीच्या पवित्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव, नागेश मामा बाबुराव गायकवाड, सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा,लहू गायकवाड, सुधीर बहिरवाडे, श्रीकांत श्रीराम जाधव, सचिन विलास जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील भक्तगण विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.



