मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवून भाजपाने घेतली प्रचारात आघाडी
मतदार महायुतीच्याच पाठीशी : आमदार देवेंद्र कोठे यांचा विश्वास

.
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी बुधवारी भाजपाने प्रत्येक मतदारापर्यंत स्लीप पोहोचवण्यावर भर दिला. प्रत्येक मतदाराशी संपर्क झाल्यामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले.

महायुतीकडून पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ श्रीराम गावडे यांच्या प्रचारासाठी शहर भारतीय जनता पार्टीने आपली मोठी प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारापर्यंत किमान तीन वेळा संपर्क होण्यासाठी भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी जोरदार प्रयत्न केले.

प्रत्येक मतदारापर्यंत स्लीप पोहोचवण्यासाठी भाजपाची यंत्रणा बुधवारपर्यंत मैदानात उतरली होती. याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार बुधवारीही भाजपाच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण सोलापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरून मतदारांशी संपर्क साधत त्यांना स्लिप वाटप केले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे याचे प्रात्यक्षिकदेखील पत्रकाच्या तसेच व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आले. गृहभेट, बैठका, ऑनलाइन, डिजिटल संपर्क, प्रत्यक्ष भेटी, पत्रक वाटप, स्लिप वाटप अशा विविध प्रकारे मतदारांशी संपर्क केल्यामुळे भाजपाने प्रचारात मोठी आघाडी मिळवल्याचे चित्र दिसून आले.
——-
कोट
मतदार महायुतीच्याच पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनुक्रमे देशात आणि महाराष्ट्रात केलेला विकास मतदार पाहत आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदारही सुजाण आहेत. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि धमक महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्यात असल्याची मतदारांना पक्की खात्री आहे. त्यामुळे मतदार महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



