india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून कॉलेज कर्मचारी युनियनचा निर्णय

प्रतिनिधी

 

 

सोलापूर, दि. 18 –

 

 

रखडलेली नोकरभरती, अनुकंपा तत्त्वावरील रिक्त पदे आणि १०, २०, ३० वर्षांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांतील पात्र मतदारांनी या निर्णयात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
राज्यात २०१३ पासून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरभरती झालेली नाही. अनुकंपा तत्त्वावरील पदेही रिक्त असल्याने महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अपुऱ्या मनुष्यबळावर सुरू आहे. दुसरीकडे, राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला असताना शिक्षकेतर कर्मचारी मात्र त्यापासून वंचित असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागण्यांबाबत अनेकदा आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजित संगवे, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर आणि खजिनदार राहुल कराडे यांनी हे आवाहन केले आहे.
चौकट—

आश्वासनांवर किती दिवस
विश्वास ठेवायचा? : भोसले

 

 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. नोकरभरती आणि अनुकंपा पदांचा प्रश्न प्रलंबित असताना प्रगती योजनेच्या लाभापासूनही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निषेध म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button