बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

मुंबई दि.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुक 2026 चा निकाल आज मुंबई येथे जाहीर करण्यात आला व त्यामध्ये सोलापुरचे जेष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्य पदाकरिता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीस उभारलेल्या एकूण 155 उमेदवारांपैकी 18 पुरूष व 5 महिला सदस्यांच्या निवडीकरिता पसंतीक्रमाने सुमारे एक लाख वकिलांनी दि. 24 मार्च रोजी मतदान केले होते. ॲड.मिलिंद थोबडे यांनी पहिल्या पसंतीची 3829 मते मिळवुन पाचव्या स्थानी निवडुन आल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. अजय नाथानी यांनी जाहीर केले.
यापूर्वी सन 2010 व 2019 मधे झालेल्या बार कौन्सिलच्या निवडणुकीत ॲड.मिलिंद थोबडे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता व यंदाच्या निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. ॲड.मिलिंद थोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सन 2011 व 2022 मधे अध्यक्षपद भूषविले.ॲड.मिलिंद थोबडे यांनी आय.एल.एस लॉ कॉलेज मधून 1983 साली एलएलबी पदवी घेऊन ज्येष्ठ विधिज्ञ काकासाहेब थोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायास सुरुवात केली. ॲड.मिलिंद थोबडे यांनी 1992 साली सोलापूर बार असोसिएशनचे सचिव पद तर 2005 साली अध्यक्षपद भूषविले आहे.
ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपल्या कार्यकाळात गोवा येथे बार कौन्सिल च्या कार्यालयाची स्थापना, राज्यस्तरीय कार्यशाळांचे यशस्वी आयोजन, विमा योजना अमलात आणणे, मेडिक्लेम योजनेच्या माध्यमाने वकिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, महिला मेळाव्यांचे आयोजन, मृत वकिलांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळवुन देणे, नवोदित वकिलांना लॅपटॉप व कायदेविषयक पुस्तकांचे विनामूल्य वितरण करणे अशा व विविध उपक्रम राबवून सतत गरजु वकिलांना सहाय्य केले आहे.
ॲड.मिलिंद थोबडे यांनी सन 2022 मधे काकासाहेब थोबडे फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातुन देखील विद्यार्थ्यांकरिता राज्यव्यापी मुटकोर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वकिलीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या वकिलांना आवश्यक पुस्तकांचे विनामूल्य वाटप करून त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवीत आहेत.ॲड.मिलिंद थोबडे यांनी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश श्री उदय लळीत यांचा भव्य सत्कार समारंभ व कार्यशाळेचे आयोजन देखील केले आहे.
ॲड.मिलिंद थोबडे यांनी सक्षम नवोदित वकील घडवण्यासाठी व समस्त वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे व वकील संरक्षण कायदा पारित होण्याकरीता शासनाकडे बार कौन्सिलच्या माध्यमातुन पाठपुरावा करणार असल्याचा मानस व्यक्त करून त्यांना पुनःश्च निवडुन दिल्याबद्दल सर्व वकिलांचे आभार मानले.
निवडणुक लढवणारे सोलापुर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारापैकी ॲड. असीम बांगी, ॲड. संतोष न्हावकर, ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ॲड. धनश्री घाडगे, ॲड. महेश कसबे व ॲड. हेमा शिंदे हे पराभूत झालेले आहेत.
सत्कार सोहळा
सोलापुरचे सुपुत्र तथा बार असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य ॲड.मिलिंद शिवशंकर थोबडे हे महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी तिसऱ्यांदा विजयी झाल्याने त्यांचा सोलापुर जिल्ह्यातील तमाम वकिलांना सार्थ अभिमान आहे. सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ॲड.मिलिंद शिवशंकर थोबडे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येईल
ॲड.बाबासाहेब जाधव
अध्यक्ष सोलापुर बार असोसिएशन



