आमदार विजय देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार थकीत निर्वाह भत्ता..
सोलापूरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वसतिगृह प्रवेशालाही शासनाची मान्यता

सोलापूर
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश अधिकृत करण्यास तसेच विद्यार्थ्यांना मागील कालावधीतील निर्वाह व भोजन भत्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही निर्वाह भत्ता मिळत नव्हता. विशेषतः सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय अडचणींमुळे लाभांपासून वंचित राहावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार विजय देशमुख यांनी इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी मंत्रालयात पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या.
२२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयातून यासंदर्भात आदेश काढण्यात आले. त्यानंतर ७ मे २०२६ रोजी पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता देण्याबरोबरच भोजन व निर्वाह भत्ता अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
“विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार” — विजय देशमुख
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार विजय देशमुख यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये. विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी आपण पुढेही प्रयत्नशील राहणार आहोत.



