maharashtrapoliticalsocialsolapur

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

 

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा नियमितपणे मिळाव्यात याकरिता आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल पाठपुरावा करत आहेत.

 

 

 

शहरातील विशेषतः अक्कलकोट रस्त्यावरील नागरिकांच्या सोयीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देऊन अर्बन स्ट्रीट पार्क विकसित करण्यात आले आहे. या पार्कमुळे परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी अत्यंत चांगली सोय उपलब्ध झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोऱ्या तसेच अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्या होत्या. याची तात्काळ दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी अर्बन स्ट्रीट पार्क परिसराची पाहणी करत महापालिका तसेच पोलीस प्रशासनाला सूचना देत नागरिकांच्या सुविधांमध्ये तडजोड न करण्याबाबत सांगितले.

 

 

 

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेने अर्बन स्ट्रीट पार्क मधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात लोखंडी बाकडे बसवावेत, येथील झाडांना नियमितपणे पाणी देऊन येथील झाडांची निगा राखावी अशा सूचना सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला केल्या.

 

 

 

 

तसेच रात्री होणारे गैरप्रकार आणि चोऱ्या थांबवण्यासाठी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांना फोन करून केली. पोलीस प्रशासनाने यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत अर्बन स्ट्रीट पार्क परिसरात कायमस्वरूपी क्यूआर कोड बसवून पोलिसांची रोजची गस्त निश्चित करण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, अजय पोन्नम, अक्षय अंजीखाने, ज्ञानेश्वर म्याकल, ऋषिकेश मेट्रे, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
——-

कोट

अर्बन स्ट्रीट पार्क हे सोलापुरातील नागरिकांना फिरण्यासाठी उत्तम ठिकाण ठरावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शासनाचा हेतू साध्य होण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button