उपचारातील कथित हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; डॉक्टर, व्यवस्थापक व बाऊन्सरवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

सोलापूर
शहरातील जुना पुणा नाका परिसरातील शिव संतोषी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर, हॉस्पिटल व्यवस्थापक व एका अज्ञात बाऊन्सरविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अर्जुन ज्ञानेश्वर कांबळे (वय ३२, रा. गणेश नगर, मडकी वस्ती, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. शरणबसप्पा मल्लिकार्जुन दामा, हॉस्पिटलचे व्यवस्थापक तसेच एका अज्ञात बाऊन्सरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई जयमाला कांबळे (वय ५४) यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना दि. ६ जून २०२५ रोजी जुना पुणा नाका येथील शिव संतोषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दि. ६ जून ते ११ जून २०२५ या कालावधीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराच्या प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय नियमांचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, दि. ७ जून रोजी महिलेची आवश्यक तपासणी न करता थेट शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेषतः ऑपरेशनपूर्व सोनोग्राफी न करता शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नवनित हॉस्पिटल येथे हलविले.नवनित हॉस्पिटलमध्ये काही दिवस उपचार सुरू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दि. १४ मे २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या मृत्यूस शिव संतोषी हॉस्पिटलमधील निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादी अर्जुन कांबळे यांनी केला आहे.

दरम्यान, आईच्या उपचाराबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी हॉस्पिटलमध्ये गेले असता तेथील व्यवस्थापक व बाऊन्सर यांनी त्यांच्याशी उद्धट वर्तन करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), ३१२, ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत.
या प्रकरणामुळे खासगी रुग्णालयांतील उपचार पद्धती, रुग्ण सुरक्षेचे प्रश्न आणि वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे…..



