crimemaharashtrapoliticalsocialsolapur

एकाच रात्रीत कॉसिनो,सुखसागर,सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा ९१ जणांवर गुन्हे….

तब्बल १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त....

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच रात्रीत तीन ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत तब्बल १ कोटी २१ लाख ८३ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ९१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्केस्ट्रा बारचा परवाना घेऊनही निर्धारित वेळेनंतर बार सुरू ठेवणे, महिलांकडून अश्लील हावभाव व नृत्य करून घेणे, तसेच पैशांची उधळण करणे असे प्रकार सुरू होते. हे प्रकार कायद्याने गुन्हा असल्याने विशेष पथके तयार करून छापेमारी करण्यात आली.

तीन ठिकाणी समांतर कारवाई

दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सोलापूर तालुका व बार्शी तालुक्यातील तीन ऑर्केस्ट्रा बारवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली.

१) कॉसिनो ऑर्केस्ट्रा बार, कोंडी (ता. उत्तर सोलापूर)
या ठिकाणी बार मालक प्रभाकर काळे यांच्या संमतीने मॅनेजर अमोल चव्हाण व माधव सामल यांच्या माध्यमातून ११ महिलांकडून अश्लील नृत्य करवून घेतले जात असल्याचे आढळले. येथे २३ ग्राहकही उपस्थित होते. पोलिसांनी सुमारे ४६.३१ लाखांचा मुद्देमाल (साउंड सिस्टम, लॅपटॉप, रोख रक्कम, वाहने) जप्त केला.

 

 

२) सुखसागर ऑर्केस्ट्रा बार, खेड (ता. उत्तर सोलापूर)
मालक मिथून राठोड व मॅनेजर वैभव शिवलगी यांच्या संगनमताने ७ महिलांकडून अश्लील नृत्य करवून घेतले जात असल्याचे उघड झाले. येथे १८ ग्राहक सापडले. पोलिसांनी १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल (साउंड सिस्टीम, रोख रक्कम, ९ वाहने) जप्त केला.

 

३) सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार, बळेवाडी (ता. बार्शी)
या ठिकाणी बार मालक युवराज बारंगुळे व समाधान पाटील यांच्या संमतीने मॅनेजर अमोल पाटील यांच्यामार्फत १८ महिलांकडून अश्लील नृत्य करवून घेतले जात होते. येथे ९ ग्राहक आढळले. पोलिसांनी तब्बल ५७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात साउंड सिस्टम, मोबाईल, वाहने तसेच एक तलवारही मिळून आली.

एकूण कारवाई

या तिन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण ९१ आरोपींवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १.२१ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांचे मार्गदर्शन आणि पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विशाल नवले (परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक), अनिल सनगल्ले, देवीदास कारंडे, तसेच पोलिस अंमलदार आणि दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

कठोर कारवाईचा इशारा

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे बेकायदेशीर आणि अश्लील कृत्य करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button