crimemaharashtrapoliticalsocialsolapur

आयसीटीसीच्या खोट्या एचआयव्ही अहवालामुळे गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त

अनुदान हडपण्यासाठी खोटे रिपोर्ट देण्याचा संशय, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

(अन्यथा पीडिता तिच्या बाळासह 01 मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार)

 

सोलापूर

 

 

अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय (आयसीटीसी) एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने केंद्राने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सात महिने गर्भवती असलेल्या पीडितेस ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा व बेजबाबदार अहवाल दिला. या एका अक्षम्य चुकीमुळे एका निरपराध गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला. त्या खोट्या एचआयव्ही अहवालाच्याआधारे पतीने व सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला घराबाहेर काढून पुन्हा नांदविण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे त्या पीडितेचा संसार उध्दवस्त होवून ती व तिचे मूल कौटुंबिक सुखापासून दुरावले. व पीडितेचे विनाकारण चारित्र्य हनन झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावे की, संबंधित पीडिता या कधीही एचआयव्ही पॉझिटिव्ह नव्हत्या व त्या पूर्णपणे एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे वर्तमान पत्रातून जाहीर करण्यात यावे. तसेच पीडितेस झालेल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक नुकसानीबद्दल शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी व उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा.

 

 

 

 

 

असे न केल्यास 01 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती छावाचे अॅड. योगेश पवार, पीडिता सुजाता विजय नलवडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रसूतीपूर्व नियमित तपासणीसाठी पीडिता अकलूज शासकीय रुग्णालयात गेल्या असता आयसीटीसी केंद्राने तीन किटद्वारे एचआयव्ही चाचणी केली व एचआयव्ही अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले. त्या अहवालावर आयसीटीसी चे डॉ. जे. एस. नेरे यांची स्वाक्षरी व शिक्का आहे. त्यानंतर त्या पीडितेस पंढरपूर ART Centre येथे पाठवून अनावश्यक Anti-Retroviral Therapy सुरू करण्यात आली.

 

 

 

 

मात्र त्यानंतर सदर पीडितेने महिलेने स्वतः पुढाकार घेऊन अनेक स्वतंत्र केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्वच अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आले. दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी SDH इंदापूर, जिल्हा पुणे येथे एचआयव्ही Antibody चाचणी Non-Reactive आली. दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी SDH पंढरपूर, ICTC केंद्र येथेही एचआयव्ही Antibody चाचणी Non-Reactive आली. दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी PHC शंकरनगर येथून पाठविलेल्या रक्त नमुन्याची Hindlabs Kharghar येथे HIV-PCR पद्धतीने केलेल्या एचआयव्ही Qualitative चाचणीचा निकाल एचआयव्ही-1 RNA Not Detected असा आला आणि त्याच दिनांकाचा PCR Quantitative म्हणजेच Viral Load चाचणीचाही निकाल Not Detected असाच आला.

 

 

 

 

 

 

तसेच दिनांक ०८ एप्रिल २०२६ रोजी SDH बारामती, जिल्हा पुणे येथे एचआयव्ही चाचणी सुध्दा Negative आली. या सर्व प्रमाणित शासकीय अहवालानुसार संबंधित पीडिता एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे सिध्द होते. PCR ही एचआयव्ही निदानातील सर्वाधिक संवेदनशील, अचूक व विश्वासार्ह चाचणी आहे. या चाचणीमध्ये एचआयव्ही-1 RNA Not Detected आलेला असताना अकलूज आयसीटीसीने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीयदृष्ट्या संपूर्णतः खोटा व बेकायदेशीर असल्याचे निःसंशयपणे सिद्ध होते.

 

 

 

 

 

 

नॅको म्हणजेच National AIDS Control Organisation च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एचआयव्ही पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी Confirmatory Test बंधनकारक आहे. अकलूज आयसीटीसीने ती टेस्ट न करताच थेट गर्भवती महिलेला पॉझिटिव्ह घोषित केले. गर्भावस्थेत हार्मोनल बदलांमुळे एचआयव्ही Antibody चाचणीत False Positive येण्याची शक्यता अधिक असते हे वैद्यकीयदृष्ट्या सुपरिचित असताना कोणतेही Cross-verification केले नाही. योग्य गोपनीयता न राखल्यामुळे हा संवेदनशील अहवाल अशा प्रकारे कुटुंबापर्यंत पोहोचला की महिलेच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या खोट्या अहवालाचे परिणाम केवळ वैद्यकीय पातळीवर थांबले नाहीत. पतीने व सासरकडील लोकांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल पाहताच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेतला. विवाहित स्त्रीला एचआयव्ही कसा होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करत तिच्यावर चारित्र्यहीन असल्याचे आरोप करून तिला सासरच्यांनी घराबाहेर काढले व पुन्हा नांदविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पीडितेस लहान मुलांस घेवून माहेरी येणे भाग पडले. तसेच सामाजिक बदनामी, मानसिक यातना व एकाकीपण यांचा सामना करावा लागला. अनावश्यक ART उपचारांमुळे स्वत:सह गर्भातील बाळाच्या आरोग्यावरही अनाठायी धोका निर्माण झाला. पीडितेस न्यायासाठी विविध शासकीय कार्यालयांच्या चकरा मारताना आर्थिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला.

 

 

 

 

 

एका सरकारी केंद्राच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध महिलेचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तिच्या सन्मानावर खोटा कलंक लागला व तिच्या न जन्मलेल्या बाळावरही अन्याय झाला.
हे प्रकरण केवळ एकट्या पीडिते पुरते मर्यादित नाही. कारण सोलापूर जिल्ह्यात अलीकडील काळात शासकीय आयसीटीसी केंद्रांकडून एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्याचे प्रमाण संशयास्पदरीत्या वाढले असल्याची माहिती समोर येत आहेत. आयसीटीसी केंद्रांना भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून पेशंट संख्येच्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचे अनुदान प्राप्त होते. पेशंटची संख्या कमी झाल्यास केंद्र बंद होण्याची व अनुदान बंद होण्याची भीती असते. त्यामुळे केंद्र सुरू ठेवण्यासाठी आणि अनुदान हडपण्यासाठी निरोगी व्यक्तींना खोटे एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर संशय या प्रकरणातून निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांतील सर्व आयसीटीसी केंद्रांचे एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल व त्यावर आधारित अनुदान यांचे ऑडिट करण्यात यावे.
आयसीटीसी अकलूजचे डॉ. जे. एस. नेरे व यातील सर्व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणे चुकीचा वैद्यकीय अहवाल देणे, गोपनीयतेचा भंग करणे व महिलेच्या कौटुंबिक जीवनास जाणीवपूर्वक हानी पोहोचवणे या आरोपांखाली तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. राज्यातील सर्व आयसीटीसी केंद्रांमध्ये, विशेषतः गर्भवती महिलांच्या बाबतीत, Naco प्रोटोकॉलनुसार Confirmatory Testing सक्तीने राबविण्यात यावी व उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावे की, संबंधित पीडिता या कधीही एचआयव्ही पॉझिटिव्ह नव्हत्या व त्या पूर्णपणे एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे वर्तमान पत्रातून जाहीर करण्यात यावे.

 

 

 

 

 

तसेच पीडितेस झालेल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक नुकसानीबद्दल शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी व उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा. असे न केल्यास 01 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. या पत्रकार परिषदेस छावाचे अॅड. योगेश पवार, पीडिता सुजाता विजय नलवडे व विश्वजीत चुंगे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button