मार खाऊन ॲट्रॉसिटीची केस : अखेर मिळाला मोटे यांना न्याय:- ॲड. धनंजय माने

नरखेड ता. मोहोळ येथे
दि. २९/ ०५/ २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अक्षय कसबे रा. नरखेड यास जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केली या आरोपावरुन नरखेडचे तलाठी चंद्रकांत मारुती मोटे रा. वाळुज ता. मोहोळ यांचे विरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सेशन्स कोर्टात होऊन न्यायालयाने तलाठी मोटे यांची निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी अक्षय कसबे याचा मित्र मनोज मोटे याच्या शेताचा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा का केला नाही अशी विचारणा केले असता मोटे यांनी त्यास जातीवाचक शिवीगाळ केली व मारहाण केली असे सरकारपक्षाचे म्हणणे होते.
सकाळी तलाठी ऑफिसमध्ये आणि पेट्रोलपंपासमोर दयानंद राऊत, योगेश राऊत आणि मनोज राऊत यांनी आपणास मारहाण केली, खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी दिली अशी तक्रार तलाठी मोटे यांनी मोहोळ पोलीस स्टेशनला केल्यानंतर त्यांना औषधोपचारासाठी सरकारी दवाखान्यात देखील दाखल करण्यात आले होते.
त्याबाबतचे सर्व कागदपत्र मोटे यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
तलाठी मोटे यांनी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत व खोटया ॲट्रॉसिटी केसमध्ये गुंतवण्याच्या मिळालेल्या धमकीबाबत मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीस शह देण्यासाठी दयानंद राऊत याने मित्र अक्षय कसबे यास पुढे करुन तलाठी मोटे यांना ॲट्रॉसिटी खटल्यात खोटेपणाने गुंतवले आहे. विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर व विसंगतीपुर्व पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड धनंजय माने, ॲड जयदीप माने, ॲड प्रणित जाधव, ॲड श्रीहरी कुरापाटी, ॲड किरण गवळी यांनी काम पाहिले.



