पुढील वर्षभरात भाजपाचे नवे कार्यालय करण्याचा पालकमंत्र्यांचा संकल्प…
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा कार्यालयात ध्वजारोहण

सोलापूर : प्रतिनिधी
आगामी वर्षभरात सोलापूर शहर जिल्हा भाजपासाठीचे नवे कार्यालय उभे करण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी केला. भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा शहर कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपाने राष्ट्रप्रथम ही विचारधारा स्वीकारत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली आहे. सेवा, समर्पण आणि संघटन या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो, ही बाब प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची आहे. अवघ्या दोन खासदारांवरून भाजपाने ३०० खासदार संख्येपर्यंत मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत.

सोलापूर महानगरपालिकेतही प्रथमच ८७ नगरसेवक निवडून आल्याने इतिहास रचला गेला आहे. त्याचबरोबर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. लक्षावधी कार्यकर्ते भाजपाशी अधिक जोमाने जोडले जात आहेत. पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार होत असताना पक्षाच्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे काम अधिक विस्तृत आणि प्रशस्त जागेत करता यावे, त्यांना सन्मानाने बसण्याची जागा असावी अशी अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती. या इच्छेच्या पूर्ततेसाठी भाजपाचे नवे कार्यालय बांधण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प आगामी वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.
————-
चौकट
कार्यालयातील अपुरी जागा अन टाळ्यांचा कडकडाट
भाजपाच्या स्थापनेपासून सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रचंड मोठ्या संख्येने भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच झालेल्या पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमास सोमवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संख्येच्या तुलनेत भाजपा कार्यालयातील जागा अपुरी पडली.
परिणामी, अनेक कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उभे राहून पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे ऐकावी लागली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपाच्या नव्या कार्यालयाचा संकल्प बोलून दाखवताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.



