मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश : आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही झाली होती सकारात्मक चर्चा...

श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नवीन एम.आर. आय. मशीन होणार उपलब्ध
सोलापूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होणार आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन एम. आर. आय. मशीन मिळण्यासाठीच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर सही करत याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले.
सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सध्या असलेली एम.आर.आय. मशीन १२ वर्षे जुनी असून ती कालबाह्य झालेली आहे. या मशीनच्या विक्री बाबतची निविदाही डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काढली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासह परिसरातील जिल्हे तसेच कर्नाटक, तेलंगणातूनही रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येतात. सोलापुरात उपचारासाठी आल्यानंतर खासगी रुग्णालयातून या रुग्णांना एम. आर. आय. करण्यासाठी खासगी ठिकाणी जावे लागत आहे. बहुतांश रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने आर्थिक अडचणींना सामोरे जात अधिक रक्कम देऊन एम. आर. आय. स्कॅन करून घ्यावे लागत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नव्या तंत्रज्ञानासह एम. आर. आय. (टेस्ला -३) ही यंत्रणा तातडीने उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असून सोलापुरातील आरोग्य सुविधाही सुधारणार आहे. त्यामुळे नवी एम. आर. आय. मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर शेरा मारून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवी एम.आर.आय. मशीन देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवीन एम.आर.आय. मशीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
———-
चौकट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही झाली होती सकारात्मक चर्चा
काही महिन्यांपूर्वी पुणे येथे झालेल्या विभागीय बैठकीत सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नवीन एम.आर.आय. मशीन बसवण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही मागणी केली होती. यावेळी नवीन एम. आर. आय. मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
————-
कोट
सोलापूर हे कामगारांचे शहर आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांदरम्यान आवश्यक एम.आर.आय. स्कॅनिंग करणे गोरगरीब रुग्णांना परवडत नाही. शासनाच्या एम. आर. आय. मशीनच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागू नये याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकास होत असताना वैद्यकीय सुविधांचाही अभाव राहू नये याकरिता मी, पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. नवीन एम. आर. आय. मशीन देण्याचा सूचना देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ही मशीन मिळवण्याकरिता प्रयत्न केलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



