सोलापुरात सप्तम श्री श्याम वंदना भव्य महोत्सवाचे आयोजन….

श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवार ८ मार्च रोजी ‘सप्तम श्री श्याम वंदना महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त सोलापूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, यामध्ये दिल्लीचे प्रसिद्ध भजन गायक आणि केरळचे जगप्रसिद्ध ‘कलारीपयडू’ कलाकार प्रमुख आकर्षण असणार आहेत.
महोत्सवाची सुरुवात शनिवार ७ मार्च रोजी दुपारी ५ वाजता बाळीवेस मारुती मंदिर येथून भव्य शोभायात्रेने होईल. सोलापूरचे महापौर मा. श्री. विनायकजी कोंड्याल, तसेच उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांच्या शुभहस्ते श्री श्याम प्रभूची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ होईल.

या शोभायात्रेत दिल्ली येथील झांकी कलाकार पौराणिक वेशभूषेमध्ये सहभागी होतील. तसेच शेकडो महिला आणि पुरुष भाविक मंगलकलश व ध्वजा (निशाण) घेऊन सहभागी होणार आहेत. ही शोभायात्रा झंवर लॉन्स (जुना कारंबा नाका, सम्राट चौक) येथे विसर्जित होऊन तेथे श्री श्याम प्रभूची प्रतिष्ठापना व आरती केली जाईल.

रविवार ८ मार्च रोजी रंग पंचमीच्या दिवशी दुपारी ४ वाजता मुख्य सोहळा व भजन संध्या कार्यक्रम झंवर लॉन्स येथे संपन्न होणार आहे
या सोहळ्यात खालील विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
भजन संध्याः दिल्ली येथील सुप्रसिद्ध भजन गायिका सोनी सिस्टर्स श्याम भजनांची मेजवानी देतील.
कलारीपयडूः केरळच्या जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्टचे पथक आपली थरारक युद्धकला सादर करणार आहे.
चित्ताकर्षक झांकीः चिराग ग्रुप्सच्या कलाकारांतर्फे देवदेवतांचे जिवंत देखावे सादर केले जातील.
विशेष आकर्षणः श्री श्याम प्रभूचे दिव्य दर्शन, अखंड ज्योत आणि फुलांची होळी (फूलों की होली).
श्रद्धेचे केंद्रः खाटू श्याम मंदिर
राजस्थानमधील पिंक सिटी जयपूरजवळील खाटू येथील ‘श्री श्याम मंदिर’ हे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हारे का सहारा अशी या देवाची ख्याती असून, गेल्या कार्तिकी आणि फाल्गुन एकादशीला ४० ते ५० लाख भाविकांनी तेथे हजेरी लावून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सौलापुरात देखील सर्व धर्मीयांमध्ये श्री श्याम भक्तांची मोठी संख्या आहे व श्री श्याम मंदिर चैरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित या सोहळ्यास सोलापूरकर नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तरी यंदाही श्याम भक्तांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे निमंत्रण ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे.
भजन सोबतच अनेक कलाकारातर्फे आपापली कला सादर करण्यात येणार असल्याने कार्यक्रम बरोबर वेळेवर सुरू होणार आहे याची नोंद घ्यावी असे ट्रस्ट तर्फे आवाहन करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष आनंद खंडेलवाल, भाग्यश्री खंडेलवाल,आरती खंडेलवाल, अंजू खंडेलवाल, गोविंद खंडेलवाल, मदनगोपाल खंडेलवाल उपस्थित होते…



