स्मार्ट सिटी अंतर्गत १४ स्मशानभूमींसाठी १८ कोटींचा खर्च; कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील बैठक घेणार – महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्मशानभूमी संदर्भात आढावा बैठक पार पडली. शहरातील स्मशानभूमींच्या सुविधा, विकासकामे व पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सोलापूर शहरात एकूण ३३ स्मशानभूमी असून त्यापैकी १४ स्मशानभूमींचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. या चौदा स्मशानभूमींच्या विकासकामांसाठी एकूण १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमींमध्ये अंतर्गत रस्ते, पथदिवे, वेटिंग शेड, बर्निंग शेड, वॉशिंग एरिया, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, गॅस दाहिनी तसेच विद्युत दाहिनी आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
बैठकीदरम्यान या सर्व कामांचे सादरीकरण करण्यात आले.महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, या कामांची लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर स्मशानभूमी संदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. कामांची गुणवत्ता, सुविधा आणि नागरिकांना होणारा लाभ याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्मशानभूमी ही नागरिकांच्या अत्यंत संवेदनशील गरजांशी निगडित सुविधा असल्याने त्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, असे सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अक्कलवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, चितारी, कार्यकारी अभियंता वेंकटेश चौबे, नगरसेविका रोहिणी तळवलकर, नगरसेवक विनोद भोसले,नगरसेवक भरतसिंग बडूरवाले,नगरसेवक मेघनाथ यमुल,नगरसेवक व्यंकटेश कोंडी, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक अक्षय अंजीखाने, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेविका सारिका खजुरगे आदी मान्यवर उपस्थित होते.



