पालकमंत्र्यांच्या मागणीला यश ! जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात 350 कोटीची अतिरिक्त मागणी
सोलापूर साठी मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक

.
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या मूळ 693 कोटीच्या आराखड्यास सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक 300 कोटी आणि वारीतील कायमस्वरूपीच्या उपायोजनासाठी 50 कोटी रुपये देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्याने पदाधिकारी आले असून विकासासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी गोरे यांनी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोलापूर जिल्ह्याला अतिरिक्त 350 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेची बैठक नुकतीच पार पडली होती यावेळी 693 कोटीच्या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळात मंजुरी देण्यात आली होती हा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला. गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याला 300 कोटी रुपये अतिरिक विकास निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आराखड्याची सविस्तर मांडणी केली. काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात महापूर आला होता. यावेळी रस्ते, गटारी, शाळा, इलेक्ट्रिक पोल तसेच जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी 300 कोटी रुपये तर पंढरपूर येथील वारीसाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी अतिरिक्त 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी गोरे यांनी केली. तसेच तसेच सोलापूर शहरातील रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली .

तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक डीपीची मोठी समस्या असून त्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी लावून धरली. सोलापूर जिल्ह्यात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडले आहेत. या ठिकाणी नव्याने पदाधिकारी आले आहेत. त्यांनाही विकासासाठी निधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून अतिरिक्त 350 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला द्यावेत अशी मागणी लावून धरण्यात आली या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा निधी मंजूर करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आ. देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सोलापूरतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
…………..
चौकट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार गिफ्ट ….
नुकत्याच निवडून आलेल्या जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या सदस्यांना आपल्या भागाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मिळावा यासाठी पालकमंत्र्यांनी 300 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मकता दर्शवली आहे त्यामुळे नूतन जिल्हा परिषद सदस्य महापालिका सदस्यांना विकासासाठी पालकमंत्र्याकडून गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

………..



