सोलापूर महापालिकेची अतिक्रमणांवर धडक मोहीम; अधिकाऱ्यांचे नाव वापरून पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागांत अतिक्रमणविरोधी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा, चौक व सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत ठेवणे आणि शहर सुशोभीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई करण्यात येत आहे.
पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या देखरेखीखाली तसेच अतिक्रमण अधिकारी बनसोडे यांच्या नेतृत्वात पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान अनधिकृत स्टॉल्स, शेड्स, फलक, हातगाड्या तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी बांधकामे हटविण्यात येत आहेत.
ज्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात येत आहे, त्यांच्याकडून नियमानुसार अधिकृत कर आकारणी केली जात असून त्याबाबत पालिकेकडून अधिकृत पावती दिली जात आहे. पावतीशिवाय कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिक्रमण अधिकाऱ्यांचे नावाचा गैरवापर करून कोणीही पैशांची मागणी करत असल्यास संबंधितांनी तत्काळ अतिक्रमण विभागाशी संपर्क साधावा. अशा प्रकारच्या बनावट वसुलीप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण अधिकारी बनसोडे यांनी दिला आहे.
तसेच तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेची ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून, नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करून शहर अतिक्रमणमुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे..




