निवडणूक खर्च समितीची स्थापना – राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी प्रशिक्षण /मार्गदर्शन बैठक….

सोलापूर
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉल येथे राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच उमेदवारांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शन/प्रशिक्षण पर बैठकआयोजित करण्यात आली होती.यावेळी मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे यांच्या सह अधिकारी उपस्थिती होते.या बैठकीत मुख्यलेखाअधिकारी श्री.डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी उपस्थितांना निवडणूक खर्चासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी प्रचारासाठी करण्यात येणारा प्रत्येक खर्च नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.मार्गदर्शन करताना श्री. जवळगेकर यांनी नमूद केले की,निवडणूक प्रचारासाठी होणारा प्रत्येक खर्च उमेदवारांनी दररोज खर्च नोंदवहीत नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून ते दिनांक १६ जानेवारीपर्यंतचा संपूर्ण खर्चाचा तपशील निवडणूक खर्च समितीकडे सादर करावा.तसेच दिनांक ८ जानेवारी व १२ जानेवारी रोजी खर्च तपासणी होणार असल्याने उमेदवारांनी आपल्या प्रचार खर्चाशी संबंधित बँक स्टेटमेंट सर्व ओरिजिनल पावत्या सादर करणे आवश्यक आहे.प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिराती, सभा, वाहन वापर, बॅनर, पोस्टर, सोशल मीडिया प्रचार आदी सर्व खर्च नियमांनुसार नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक खर्च सादर करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, खर्च नोंदवही कशी भरावी, तसेच खर्च निरीक्षकांकडून होणाऱ्या तपासणीबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. निवडणूक खर्च नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध रितीने पार पडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.



