खंडणी वसुलीप्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला न्यायालयीन कोठडीत रवानगी…

प्रतिनिधी
सोलापूर, दि.29 –
शिवभोजन केंद्र चालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितीन कांबळे या तोतया पत्रकाराचा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांकडून तसेच रेशन दुकानदारांकडून खंडणी वसुली केल्याचा गंभीर प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी समता शिवभोजन केंद्राचे चालक इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नितीन कांबळे या तोतया पत्रकाराविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आरोपी कांबळे याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी घेतली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
शेख यांच्या फिर्यादीनुसार, नितीन कांबळे याने शिवभोजन केंद्र सुरू ठेवायचे असल्यास दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कांबळे हा पुरवठा विभागाकडे खोट्या तक्रारी करीत होता तसेच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देत होता.
मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादी व इतर शिवभोजन केंद्र चालकांकडून एकूण 2 लाख 44 हजार 500 रुपये रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही रक्कम काही वेळा स्वतः तर काही वेळा केंद्र चालक अनिल भिंगारे यांच्या मार्फत घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डिसेंबर महिन्यासाठीही 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तसेच, ऑगस्ट 2025 मध्ये हप्ता वाढवून मागण्यात आल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने, अज्ञात व्यक्तीमार्फत खोट्या तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
चौकट……..
आरोपीला कडक शासन करा
शिवभोजन योजना ही 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आलेली असून, गरीब व गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयांत सकस जेवण देणे हा तिचा उद्देश आहे. या योजनेशी संबंधित केंद्र चालकांना धमकावून खंडणी वसुली केल्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे. यातील आरोपीला कडक शासन करण्याची मागणी शिवभोजन केंद्र चालक व रेशन दुकानदारांकडून होत आहे.
चौकट….
वेळीच मुसक्या आवळायला हव्या होत्या
वारंवार खंडणी व सरकारी कामात अडथळा आणत असल्याबद्दल आरोपी नितीन कांबळे व त्याच्या अन्य साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या ब परिमंडळ कार्यालयातील परिमंडळ अधिकार्यांनी यापूर्वी दोन वेळा पत्र पाठवून जेलरोड पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने आरोपीची मजल वाढत गेली. आरोपीच्या मुसक्या वेळीच आवळल्या असत्या तर शिवभोजन केंद्र चालकाला खंडणी मागण्याचे धाडस आरोपीचे झाले नसते, अशी शिवभोजन केंद्र चालक व रेशन दुकानदारांत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.



