स्वीकृत नगरसेवक पद नाकारून राजाभाऊ आलोरे अपक्ष मैदानात; प्रभाग पाचमध्ये राजकीय खळबळ….

सोलापूर
प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक पदासाठी स्वीकृती मिळूनही ती नाकारत राजाभाऊ आलोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
याच प्रभागातून त्यांच्या सहकाऱ्यांपैकी सरस्वती सुरवसे यांना सफरचंद तर शितल झाडगे यांना कपाट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. या तिन्ही उमेदवारांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग पाचमधील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजाभाऊ आलोरे यांनी भाजपमधील अंतर्गत कारभारावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “पक्ष वाढवण्याऐवजी काही जण आपल्या परिवाराचा आणि गटाचा विस्तार करण्यावर भर देत आहेत. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून आमची स्पष्टपणे फसवणूक झाली आहे.”
राजाभाऊ आलोरे यांनी पुढे सांगितले की, “आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला एबी फॉर्म दिला होता. मात्र, नंतर विरोधकांना दिशाभूल करण्यात आली आणि ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला.
त्यामुळे आमच्यासमोर अपक्ष निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.”
आपल्या विजयाबाबत त्यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, “प्रभागातील नागरिकांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे. जनतेच्या बळावर आम्ही बहुमताने निवडून येऊ, याची मला पूर्ण खात्री आहे.”
दरम्यान, प्रभाग पाचमध्ये आधीच मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले असताना राजाभाऊ आलोरे यांची अपक्ष उमेदवारी ही सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मुद्दा आणि स्थानिक नाराजी या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



