उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस:- ॲड. धनंजय माने…

सोलापूर
तब्बल एक वर्षापासून अधिक काळ कारागृहात खितपत पडलेल्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी केवळ रासायनिक तज्ञाकडून जप्त मुद्देमालाची तपासणी होऊन अहवाल न आल्याने खोळांबून असल्यामुळे, उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा अशी नोटीस काढणेबाबत आरोपीपक्षातर्फे केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर करुन उप संचालकांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे.
अत्याचार केल्याच्या आरोपावरुन एक वर्षापासून कारागृहात खितपत पडलेल्या श्रीराम शिंगाडे रा. ईश्वर वाठार ता. पंढरपूर या युवकाच्या खटल्याची सुनावणी तब्बल एक वर्षापुर्वी रासायनिक तज्ञाकडे पाठवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालाची रासायनिक तपासणी होवुन मुद्देमाल परत न आल्याने आणि तपासणी अहवाल न आल्याने खोळंबुन राहिलेली आहे.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल परत आणण्यासाठी नेमणुक केलेला स्पेशल कॉन्स्टेबल सोलापूर येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे जाऊन मुद्देमाल परत मिळणे बाबत पत्र देऊन तीन महिने उलटून गेले, तरीही तज्ञांनी मुद्देमाल तपासणी करुन अहवाल दिला नाही आणि मुद्देमालदेखील परत केला नाही त्यामुळे, आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी असा अर्ज न्यायालयात सादर केला. न्यायालयाने सदर अर्ज मंजुर करुन उपसंचालक यांना कारणे दाखवा नोटीस काढून प्रकरण सुनावणीसाठी दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी नेमले आहे.
या खटल्यात आरोपतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार,ॲड. किरण गवळी तर सरकारतर्फे ॲड. शेख काम पाहत आहेत.
खटल्याच्या सुनावणी विना अनेक आरोपी न्यायालयीन कोठडीत खीतपत पडलेले आहेत. त्या आरोपींचे खटले त्वरीत चालवणेबाबत उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. परंतु केवळ रासायनिक तज्ञांचा अहवाल व मुद्देमाल न्यायालयात सादर न केला गेल्यामुळे अनेक खटल्याची सुनावणी होत नसल्यामुळे अनेक कच्च्या कैद्यांना बंदीवासात राहावे लागत आहे. याबाबत उच्च न्यायालयात आरोपीतर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे.



