माळशिरस, नगरपंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी, डॉ. विश्वनाथ वडजे यांच्याविरुद्धच्या लाच प्रकरणाची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार…

यात हकीकत अशी की,
नगरपंचायत माळशिरस बांधकाम विभागाकडून तिरुपती कन्स्ट्रक्शन यांना माऊली चौक, माळशिरस ते कचरेवाडी हा रस्ता डांबरीकरणाचे काम मिळालेले होते. सदरचे काम तिरुपती कन्स्ट्रक्शन यांनी तक्रारदारांना सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेले होते. तत्कालीन नगरपंचायत मुख्याधिकारी, डॉ. विश्वनाथ वडजे यांनी रस्त्याच्या कामाचे बिल तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्या बँक खात्यात जमा केल्याच्या बदल्यात मोबदला म्हणून देयकाच्या रकमेपैकी तीन टक्के रक्कम रु. 1,00,000/- ची लाचेची मागणी तक्रारदारांकडे केलेली होती. त्यामुळे तक्रारदाराने मुख्याधिकारी, डॉ. वडजे यांच्याविरुद्ध पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केलेली होती.
त्यानुसार पुणे लाचलुचपत विभागामार्फत तक्रारदाराच्या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न होत असल्याने मुख्याधिकारी, डॉ. वडजे यांच्याविरुद्ध पुढील सापळा कारवाई करण्यात आलेली होती. परंतु मुख्याधिकारी, डॉ. वडजे यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्धची पुढील सापळा कारवाई रद्द करण्यात आलेली होती. त्यानंतर माळशिरस पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये मागणी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
लाचलुचपत विभाग, सोलापूर यांनी माळशिरस येथील मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये डॉ. वडजे मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणातील तत्कालीन मुख्याधिकारी, डॉ. विश्वनाथ वडजे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी दोषमुक्तीसाठी व न्यायालयास गुन्हाची दखल घेता येणार नाही, असा अर्ज दाखल केलेला होता.
आरोपीच्यावतीने असे मुद्दे मांडण्यात आले की, तक्रारदार यांचा तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्याशी किंवा त्यांना मिळालेल्या कामाशी कसलाही संबंध नसल्याचे तसेच तिरुपती कन्स्ट्रक्शन यांनी केलेल्या कामाचे बिल हे पूर्वीच मंजूर केले असल्याने डॉ. वडजे, मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस यांच्याकडे तक्रारदाराचे कोणतेही शासकीय काम प्रलंबित नसल्याचे तसेच लाच पडताळणीच्यावेळी पंच साक्षीदार उपस्थित नसल्याचे तसेच आरोपीकडून कोणत्याही प्रकारची स्पष्टपणे लाच मागणी झाले नसल्याचे व मंजुरी नाकारल्याचे कागदपत्रांच्या आधारे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवून लाचलुचपत पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणताही सबळ व ठोस पुरावा नसताना देखील खोटेपणाने प्रस्तुत प्रकरणात दोषारोप पत्र दाखल केल्याचे व कायद्यातील अनिवार्य तरतुदीची पूर्तता केली नसल्याने आरोपीविरुद्ध गुन्ह्याची दखल घेता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात येऊन त्यापृष्ठर्थ मा. ना. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले दिलेले होते.
ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून माळशिरस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (श्री. आर. व्ही. ताम्हणेकर साहेब) यांनी तत्कालीन मुख्याधिकारी, डॉ. विश्वनाथ वडजे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याची दखल घेण्यास नकार देऊन दोषारोपपत्र लाचलुचपत विभागाकडे परत पाठवून देण्याचे आदेश केलेले आहेत.
सदर प्रकरणात आरोपी डॉ. विश्वनाथ वडजे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. ज्ञानेश कचरे (माळशिरस), ॲड. राणी गोडबरलू(गाजुल), ॲड. ओंकार परदेशी, ॲड. मधुश्री देशपांडे, ॲड. तेजस साळुंखे यांनी काम पाहिले.



