अपंग व्यक्तीच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती मैदानात; २७ जुलै रोजी जुळे सोलापुरात अंत्यविधी व तिरडी आंदोलन
"जगा सन्मानाने..!!", "अन्याय सहन करणार नाही, हक्कासाठीचा लढा थांबणार नाही !"

सोलापूर : जुळे सोलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडून एका अपंग व्यक्तीचे पगार खाते कथितरीत्या बेकायदेशीरपणे बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीडित व्यक्तीला न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया, जुळे सोलापूर शाखेसमोर लोकशाही व घटनात्मक मार्गाने अंत्यविधी व तिरडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. सुप्रिया शिरदाळे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुळे सोलापूर येथील शरनाप्पा पुंडलिक जेऊरे यांचे पगार खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, जुळे सोलापूर शाखेकडून कथितरीत्या कोणतीही योग्य कारणे न देता बंद करण्यात आले. त्यामुळे त्यांचा नियमित पगार अडकल्याने संपूर्ण कुटुंब गंभीर आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दैनंदिन खर्च, औषधोपचार, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि इतर आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचेही सांगण्यात आले.
या संदर्भात श्री. जेऊरे यांनी बँक प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून खाते पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. मात्र, अनेक पाठपुरावे करूनही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची महाराष्ट्र लोकाधिकार समितीने गंभीर दखल घेतली असून, अपंग व्यक्तीच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी समिती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे अॅड. सुप्रिया शिरदाळे यांनी सांगितले. संबंधित बँक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी करावी, कायदेशीर व न्याय्य तोडगा काढावा आणि पीडित कुटुंबाला त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया, जुळे सोलापूर शाखेसमोर श्री. जेऊरे हे आपल्या कुटुंबासह लोकशाही व घटनात्मक मार्गाने अंत्यविधी/तिरडी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनातून शासन, प्रशासन आणि समाजाचे लक्ष या कथित अन्यायाकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच, अन्यायग्रस्त अपंग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग संघटना आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. सुप्रिया शिरदाळे यांनी केले आहे.
समितीने यावेळी “जगा सन्मानाने..!!”, “अन्याय सहन करणार नाही, हक्कासाठीचा लढा थांबणार नाही!” आणि “अन्यायाविरुद्ध संघर्ष – सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी!” या घोषणांसह न्यायासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेत योगेश वाघमारे, राजश्री जेऊरे, ऍड. सुप्रिया शिरदाळे, नंदकुमार लोखंडे, ओंकार बास्के यांची उपस्थिती होती.
“अन्याय सहन करणार नाही हक्कासाठी लढणार” या घोषवाक्यासह महाराष्ट्र लोकाधिकार समिती हे 3 प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आल आहे…



