india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

वाचन संस्कृतीतून समाजपरिवर्तन शक्य* – प्रा. डॉ. ऋचा कांबळे

वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोलापुरात व्याख्यान; ग्रंथालयाच्या भूमिकेवर प्रकाश

 

सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर :

 

 

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर आणि श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकमान्य टिळक अॅम्फी थिएटर येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘वाचन संस्कृती आणि समाज परिवर्तन’ या विषयावर प्रा. डॉ. ऋचा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे ग्रंथ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती वंदना काटकर यांनी प्रास्ताविकातून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

 

 

 

मुख्य व्याख्यानात प्रा. डॉ. ऋचा कांबळे यांनी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रंथालये ही केवळ पुस्तकांची साठवणूक करणारी ठिकाणे नसून ज्ञान, विचार आणि संस्कृतीचे जतन करणारी केंद्रे आहेत. विविध विचारप्रवाह, तत्त्वज्ञान, राजकारण, इतिहास आणि साहित्य यांचा समृद्ध ठेवा ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असतो. वाचनामुळे व्यक्तीची विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि सामाजिक जाणीव विकसित होते. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणणे शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यांसारखी शाश्वत मूल्ये साहित्याच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्यधर्म, रामायण, महाभारत तसेच शेक्सपिअर यांच्या साहित्याची उदाहरणे देत त्यांनी दर्जेदार वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरच्या तहसीलदार श्रीमती दांडिले उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात, “वाचनाशिवाय प्रगती शक्य नाही. पुस्तकांचे जीवनातील स्थान अनन्यसाधारण असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही पुस्तकांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान दिले,” असे सांगितले. भारतीय संविधानाच्या निर्मितीतील डॉ. आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांनी उपस्थितांना वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले.
मान्यवरांचा परिचय ग्रंथालय निरीक्षक श्री. संजय ढेरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुसा गाडगीळ यांनी केले तसेच मराठी भाषा अधिकारी श्री. प्रमोद पाटील यांनी शासनाच्या ‘ग्रंथ संजीवनी’ पोर्टलवर उपलब्ध असलेले दुर्मिळ साहित्य, स्वातंत्र्यपूर्व काळातील नियतकालिके, हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती दिली. हे साहित्य वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली व संबंधितांचे आभार मानले.

 

 

 

कार्यक्रमास मसापाचे सदस्य पद्माकर कुलकर्णी, डॉ. शिवाजीराव देशमुख, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, हिरालाल पाटील, सदाशिव बेडगे, डॉ. भीमाशंकर बिराजदार तसेच ग्रंथालय कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button