काटगावकर फायनान्स फसवणूक प्रकरण ! सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पडदूने यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसीचा आदेश ..

सोलापूरः
काटगावकर फायनान्स फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर वगैरे 3 याच्या एकूण 11 स्थावर मालमत्तेचे जाहीर लिलाव करुन लिलावातुन आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी असा आदेश सक्षम प्राधिकरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी डिसेंबर २०२५ मध्ये आदेश पारित केलेला आहे.परंतु अद्यापही लिलावाची काहीच कार्यवाही केलेली नसल्याने साक्षीदार/गुंतवणूकदार यांनी मे. न्यायालयात सक्षम प्राधिकरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई व्हावी असा अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला असून त्यामध्ये न्यायालयाने सक्षम प्राधिकरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पडदूने यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा आदेश पारित केला आहे.
मे.हरी ओम फायनान्स,मे.रिध्दी सिध्दी फायनान्स, नवरत्न फायन्नास, कमर्शियल फायनान्स या फायनान्सव्दारे हजारो गुंतवणुकदाराकडुन जास्त व्याजाचे आमीष दाखवून ठेवी गोळा करुन ४५ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची फसवणुक केल्या प्रकरणी भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मे. सत्र न्यायालयात सुरु आहे.
यातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर याची सोलापूर शहरात विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता घेतलेल्या आहेत. या सर्व मिळकती
गुंतवणुकदांरानी गुंतवलेल्या रक्कमेतून घेतलेल्या असल्याने पोलिसांनी जप्त केलेल्या होत्या. त्या सर्व वस्तु जाहीर लिलावाव्दारे विक्री करुन ती रक्कम न्यायालयात जमा करणेत यावी असा आदेश न्यायालयाने केलेला होता. परंतु अद्यापही कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याने सबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन आदेशाचा अवमान (contempt of court) कारवाई करण्यात यावी अशी मागणी मूळफिर्यादी मार्फत केली होती.
यात सरकारपक्षा तर्फे विशेष सरकारी वकील अँड.संतोष वि. न्हावकर,मूळफिर्यादीतर्फे अँड.शैलेश पोटफोडे, अँड. शहानवाज शेख तर आरोपी तर्फे अँड. शशी कुलकर्णी हे काम पहात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख 26 ऑक्टोबर नेमणेत आलेली आहे.



