आरोपीचे म्हणणे न ऐकता जी.एस.टी.च्या तक्रारीची दखल घेणारा आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द:- अॅड. गुरुदत्त बोरगांवकर…

सोलापूर
येथील एस. आर. एल. ऑईल इंडिया कंपनीचे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा, वय-३९वर्षे, तसेच महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे प्रो.प्रा. लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा वय-४०वर्षे, दोघेही रा. नाकोडा युनिटी सोलापूर या व्यापाऱ्यांवर जी.एस.टी. कार्यालय सोलापूर यांचेकडून जानेवारी २०२५ मध्ये बोगस आय.टी.सी. घेतल्याच्या संशयावरुन कारवाई झाली होती. सदर प्रकरणात जी.एस.टी. कार्यालय सोलापूर यांनी एस.आर.एल. ऑईल इंडिया प्रा.लि. व महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीच्या विरोधात सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांचे कोर्टात खाजगी फिर्याद दाखल करुन एस.आर.एल. ऑईल इंडिया प्रा.लि. या कंपनीने रक्कम रु.२१.२० कोटीचा बोगस आय.टी.सी. तसेच महालक्ष्मी ट्रेडींग यांनी रक्कम रु.१३.२९ कोटीचा बोगस आय.टी.सी. घेतल्याचा आरोप ठेवला आहे.
सदर प्रकरणात सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांचे कोर्टाने सदर फिर्यादीची दखल घेऊन आरोपींविरुध्द प्रोसेस इश्यू चा आदेश पारित केलेला होता. सदर आदेशाच्या विरोधात आरोपींनी अॅड. गुरुदत्त बोरगांवकर यांचेमार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये पुर्नविचार याचिका दाखल केलेली होती. सदर याचिकेची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.पी.पी. राजवैद्य यांचे कोर्टासमोर झाली. सदर प्रकरणाच्या सुनावणीवेळी प्रथमवर्ग न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदीप्रमाणे आरोपीस म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही त्यामुळे सदरचा आरोपीविरुध्द गुन्ह्याची दखल घेणारा आदेश हा कायद्यास अनुसरुन नाही, तो आरोपींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे सदरचा आदेश रद्द करुन आरोपीस प्रथमवर्ग न्यायालयासमोर म्हणणे दाखल करण्याची संधी द्यावी,असा युक्तीवाद केला तसेच त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन मे. कोर्टाने आरोपीस प्रथम वर्ग न्यायाधीश यांचा आरोपीविरुध्द गुन्ह्याची दखल घेणारा आदेश रद्द करुन खटल्याची नव्याने सुनावणी घेण्यात यावी व आरोपीस म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असा आदेश पारीत केला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. शिवानी करवा, अॅड. निकिता कुलकर्णी, जी.एस.टी.कार्यलयच्या अॅड. महेश झंवर यांनी काम पाहिले.
क्रि.री.नं. २४/२०२६,२५/२०२६
कोर्ट : श्री.पी.पी. राजवैद्य साो



