maharashtraBusinesspoliticalsocialsolapur

आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

शासकीय रुग्णालयात कार्यक्रम : गरजूंचा गुढीपाडवा झाला गोड

 

सोलापूर : प्रतिनिधी

दुर्धर आजारानेग्रस्त असलेल्या सुमारे ३५० गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राबविलेल्या आई प्रतिष्ठानच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे गरजूंचा गुढीपाडवा गोड झाला.

छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी प्लस सेंटरमध्ये बुधवारी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी व्याहाती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. विद्या किरणकर , उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत तोडकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी दुर्धर आजारग्रस्त मुली आणि महिलांना पौष्टिक आहाराचे ३५० किट वाटण्यात आले. उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड म्हणाले, महिलांसाठी आई प्रतिष्ठान करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दुर्धर आजारग्रस्त महिलांना पौष्टिक आहार देण्याची संकल्पना अत्यंत चांगली असून यातून महिलांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चिटणीस म्हणाल्या, दुर्धर आजाराबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर होण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आजारग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येते. औषधोपचाराने आजार बरा होत असल्यामुळे गरजू रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असेही डॉ. चिटणीस याप्रसंगी म्हणाल्या.

 

 

 

 

आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे म्हणाल्या, आई प्रतिष्ठानकडून दुर्धर आजारग्रस्त महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, शिलाई प्रशिक्षण, संगणक, ब्युटी पार्लर तसेच इतर व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा. आपण उभारलेली गुढी फक्त आपल्या घरासाठी नाही,
तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानासाठी असली पाहिजे.कोणताही आजार कोणाचं आयुष्य थांबवत नाही. तुम्हालाही स्वप्न आहेत, तुम्ही पुढे जाऊ शकता, आणि समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतात.समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांचा आधार बनून समाजाचा विकास करणे आवश्यक असल्याचेही सृष्टी डांगरे यांनी याप्रसंगी सांगितले.

 

 

 

डॉ. अग्रजा चिटणीस यांनी प्रास्ताविक तर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीता गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button