सोलापूरच्या पहिल्या महिला बॉडी बिल्डर पूजाचा उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर यांच्या हस्ते सन्मान

सोलापूर
शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या सोलापूरच्या पहिल्या महिला बॉडी बिल्डर पूजा गटटू हिचा उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूरची पूजा गटटू हिने महिला बॉडी बिल्डिंग प्रकारात सहभाग नोंदवून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूरच्या क्रीडाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर यांनी कोनापूरे चाळ येथील पूजाच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला.
यावेळी त्यांनी पूजाच्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि धाडसाचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पूजाच्या आईचाही विशेष सन्मान करून तिच्या पाठिंब्याचे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी बॉडी बिल्डिंग संघटनेचे सरचिटणीस विशाल गायकवाड, महेश देवकर, माजी नगरसेविका वैष्णवी ताई करगुळे, सुजाताताई सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
पूजा गटटू हिच्या या यशामुळे सोलापूरातील तरुणींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार असून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



