educationalmaharashtrapoliticalsocialsolapur

अध्यात्माची जोड मिळाल्यास न्यायदान सोपे..

पुणेः

सोलापूरचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश बंडोपंत दि. कुलकर्णी लिखित आणि अनुबंध प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मुक्तांची अभंग वाट’ आणि ‘ज्ञाना तू का जनी निळा, नामी गोरा?’ या पुस्तकांचे प्रकाशन सोलापूरचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. एन. जे. जमादार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. एम. के. महाजन यांच्या अध्यक्षतेत पटवर्धन सभागृह, मराठी साहित्य परिषद, पुणे येथे झाले. याप्रसंगी कार्यक्रम आयोजक अनुबंध प्रकाशनाचे संचालक अनिल कुलकर्णी उपस्थित होते.

“न्यायदानाचे काम सोपे नसते. विविध रूढी, परंपरा, प्रथा यातून व्यक्तीची मानसिक धारणा तयार होते. परंतु न्यायासनावर बसल्यावर सर्व धारणा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावे लागते. अशा वेळी निर्णय घेताना अध्यात्माची जोड मिळाल्यास निर्णय घेणे सोपे जाते.” असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी व्यक्त केले. शिवाय लेखक त्यांचे महाविद्यालयीन मित्र असल्याने लेखकाच्या पूर्व जीवनावर प्रकाश टाकून स्वभाव परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “संत साहित्याचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने बंडोपंत कुलकर्णी अभ्यास, मनन, चिंतनातून लिहिते झाले आहेत. त्यांचे लिखाण स्वानुभूतीवर आधारित आहे. न्यायाधीशांना अध्यात्माची बैठक असणे आवश्यक आहे. अनेक न्यायमूर्ती व न्यायाधीशांनी उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संतसाहित्याचा अभ्यास केला आहे.”

“न्यायदानाच्या क्षेत्रात काम करत असताना गुरूंच्या आदेशाने मी अध्यात्माकडे वळलो. त्यातूनच लिहिता झालो. संत साहित्याच्या शोधातून वाचन, साधना आणि अभ्यास या मार्गातून जे उमगले ते कागदावर उतरवले.” असे बंडोपंत कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. दत्तात्रय डुंबरे यांनी लेखकाच्या लिखाणाचा प्रवास वर्णन केले तर डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सामान्य राहणीमान तणाव झटकून टाळण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगितले. त्यावेळी न्यायाधीश डॉ. दीपक डोंगरे, अॅड. आशिष कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. सोलापूर येथून सर्वश्री माजी नगरसेवक भिमाशंकर बोलकोटे, सरकारी वकील दत्ता पवार, गंगाधर रामपूरे, सोलापूर विद्यापीठ सेनेट सदस्य मल्लिनाथ शाबादे, पंढरपूर येथील अॅड. आनंद पाटील, अॅड. उपेंद्र कुलकर्णी व

 

अॅड. प्रमोद मोहिते हजर होते. सोलापूर जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीप राजपूत यांनी शुभेच्छा पाठविल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button