पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट; पैशांची मागणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड…

सोलापूर
सोलापूर महानगरपालिका चे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नावाने व छायाचित्राचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बनावट (फेक) फेसबुक अकाउंट तयार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित फेक अकाउंटवरून सोशल मीडियाद्वारे चॅट तसेच व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलच्या माध्यमातून आयुक्तांच्या मित्र, नातेवाईक तसेच इतर परिचित नागरिकांकडे तातडीच्या कारणास्तव आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बनावट अकाउंटवरून “अत्यंत गरजेची मदत”, “तातडीची आर्थिक अडचण” अशा कारणांचा उल्लेख करून ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे पाठविण्याची विनंती केली जात आहे. काही नागरिकांनी संशय आल्याने थेट आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता हा प्रकार उघड झाला.ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संबंधित अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून आयुक्तांच्या नावाचा व छायाचित्राचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार आयुक्तांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का देणारा असून नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट होते.
सदर प्रकार हा माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहितेअंतर्गत सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत असून याबाबत सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित बनावट अकाउंट शोधून ते तात्काळ बंद करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशीही संपर्क साधण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना स्पष्ट आवाहन —
आयुक्तांच्या नावाने किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावरून पैशांची मागणी झाल्यास त्वरित खातरजमा करावी.कोणत्याही परिस्थितीत अनोळखी किंवा संशयास्पद अकाउंटवर विश्वास ठेवू नये.आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
अशा प्रकारची फसवणूक लक्षात आल्यास तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.नागरिकांनी सतर्कता बाळगून सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइल्सपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



