मरवडेतील ११२ वर्षीय आजोबांचा मतदान हक्क बजावताना आदर्श संदेश….
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत लोकशाही..चा उत्सव ; सोलापुरात शांततेत मतदान सुरू

सोलापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात आज लोकशाहीचा उत्सव उत्साहात आणि शांततेत सुरू असून सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या काटेकोर नियोजनामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे चित्र आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणाचा प्रेरणादायी प्रसंग मरवडे गावात पाहायला मिळाला. तब्बल ११२ वर्षांचे वृद्ध मतदार संभाजी रामू गणपाटील यांनी सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित राहून संविधानिक पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीने तरुण पिढीसह सर्व मतदारांमध्ये उत्साह संचारला असून, “मतदान हा प्रत्येकाचा पवित्र हक्क व कर्तव्य आहे” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला आहे.

सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या वेळेत जिल्ह्यातील एकूण मतदानाची आकडेवारी पाहता ८,२०,७६० मतदारांनी आपला हक्क बजावला असून, हे प्रमाण ३३.३७ टक्के इतके आहे. यामध्ये
पुरुष मतदार : ४,४५,७०५
महिला मतदार : ३,७५,०४८
इतर : ७
असा समावेश आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे –
करमाळा : ३०.८२%
माढा : ३०.८३%
बार्शी : ३७.५१%
उत्तर सोलापूर : ३६.२७%
मोहोळ : ३३.५४%
पंढरपूर : ३२.५६%
माळशिरस : ३३.९१%
सांगोला : ३५.०१%
मंगळवेढा : ३२.३९%
दक्षिण सोलापूर : ३१.०६%
अक्कलकोट : ३५.६६%
दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून मतदारांनी निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात शांततेत सुरू असलेली ही मतदान प्रक्रिया लोकशाहीच्या सुदृढ परंपरेचे दर्शन घडवत आहे



