प्रवीण गायकवाड यांचे अक्कलकोट मध्ये एकीकडे वाजत गाजत स्वागत तर दुसरीकडे शिवधर्म फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक व मारहाणीची घटना…
प्रवीण गायकवाड यांच्यासह जिल्हाध्यक्षाला ही शिवधर्म फाऊंडेशनच्या संतप्त जमावाने केली मारहाण...

श्री स्वामी समर्थांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी व छत्रती संभाजी महाराजांचा संघटनेसाठी एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी मारहाण व शाईफेक…
श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांचा रविवारी १३ /०७/२०२५ रोजी अक्कलकोट येथील प्रियदर्शन सांस्कृतिक भवन येथे नागरी सत्कार मानपत्र प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास श्री सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शरदराव फुटाणे ,संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड,शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांना आमंत्रण देण्यात आले होते .

या कार्यक्रमा निमित्त संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह अक्कलकोट मध्ये दाखल झाले. वाजत गाजत प्रवीण गायकवाड यांचे कार्यक्रम स्थळी स्वागत होत असताना
दुसरीकडे श्री स्वामी समर्थांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड नावाने आपली संघटना चालवत असल्याचा ठपका ठेवत अक्कलकोट मधील शिवधर्म फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर कार्यक्रमाला जात असताना शाईफेक करत त्यांना मारहाण केली . संतप्त शिवधर्म फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांचा शर्ट ही फाडला . प्रवीण गायकवाड यांच्यासह जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांना ही जमावाने मारहाण केली .त्यांच्याही तोंडाला काळे फासले. संतप्त जमावाच्या तावडीतून प्रवीण गायकवाड यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी,तसेच कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलेल्या आयोजन समितीच्या सदस्यांनी बाजूला नेले व सुटका केली.

जमावासमोर प्रवीण गायकवाड यांनी ” माझं चुकलं ,मला माफ करा मी नाव बदलतो” अशी विनवणी करूनही शिवधर्म फाऊंडेशनच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा ही दिल्या.या पूर्वीही शिवधर्म फाऊंडेशन ने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेची मान्यता काढून घेण्यात यावी यासाठी आंदोलनही केलं होत .आणि आता कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांचा शर्ट फाडत मारहाण करत शाईफेक करण्यात आल्याची घटना अक्कलकोट मध्ये घडली आहे.
या दरम्यान त्यांच्या वाहनावर दगड घालून वाहनाचे ही नुकसान करण्यात आले. संभाजी ब्रिगेड नावाच्या पूर्वी छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड हे नाव लावण्याची मागणी शिवधर्म फाऊंडेशन कडून पुन्हा एकदा करण्यात आली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी कार्यक्रम रद्द करून अक्कलकोट मधून तत्काळ पुढे नैराश्यजन्य परिस्थितीत रवाना झाले.या घटनेमुळे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या इतर अतिथी आणि उपस्थित समूहांमध्ये चर्चेला उधाण आले.या घटनेमुळे अक्कलकोट सह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.



