political

10 हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मंत्रालय पायी मोर्चा धडकणार कॉ. आडम मास्तर यांची घोषणा

सीटू चे 17 वे सोलापूर जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न!

सोलापूर | दिनांक 23 नोव्हेंबर 2025
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) चे 17 वे सोलापूर जिल्हा अधिवेशन लाल बावटा कार्यालय, दत्तनगर येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनाची सुरुवात कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.

अधिवेशनाचे उद्घाटन राज्य CITU नेते व जिल्हा प्रभारी कॉ. वसंत पवार यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारने 29 विविध कामगार कायद्यांचे चार श्रम संहितांमध्ये केलेले रूपांतर हे कामगार-विरोधी पाऊल असल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “नवीन श्रम संहितांत लेबर कोर्ट व लेबर ऑफिसची संकल्पनाच संपवण्यात आली आहे. 60 टक्क्यांहून अधिक असंघटित कामगारांवर या कायद्यांचा गंभीर परिणाम होणार आहे. कामगारांनी एकजुटीने या धोरणांविरोधात उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा व पेन्शन देण्यासाठी CITU ने सातत्याने लढा दिला असून कामगारांच्या निवाऱ्याचे स्वप्न साकार करण्यातही संघटना यशस्वी ठरली आहे.
26 नोव्हेंबर रोजी चार श्रम संहितांविरोधात देशभरात कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली.

अधिवेशनाचा अहवाल आणि कार्यवाही

CITU जिल्हा सचिव अ‍ॅड. एम.एच. शेख यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय व संघटनात्मक अहवाल सादर केला. 25 प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. दीपक निकंबे यांनी आर्थिक अहवाल मांडला. अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
शोकप्रस्ताव कॉ. विल्यम ससाणे यांनी मांडला.

कॉ नरसय्या आडम मास्तर, कॉ.व्यंकटेश कोंगारी,युसुफ शेख मेजर,नसीमा शेख, नलिनी ताई कलबुर्गी आदींनी अध्यक्षीय मंडळाचे काम पाहिले.

वृत्तांत लेखन समितीत दत्ता चव्हाण आणि किशोर मेहता यांनी काम पाहिले.

नवीन जिल्हा कमिटी निवड

अधिवेशनात 21 सदस्यीय पदाधिकारी कमिटी व 61 सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
मुख्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे:

जिल्हाध्यक्ष: कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

जिल्हा सचिव: अ‍ॅड. एम.एच. शेख

जिल्हा कोषाध्यक्ष: कॉ. दीपक निकंबे

उपाध्यक्ष: कॉ. नलिनी कलबुर्गी, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कामिनी आडम, कॉ. नसीमा शेख, कॉ. सुनंदा बल्ला, कॉ. शकुंतला पाणीभाते, कॉ. फातिमा बेग, कॉ. बापू साबळे, कॉ. दाऊद शेख

सहसचिव: कॉ. युसूफ शेख (मेजर), कॉ. किशोर मेहता, कॉ. विल्यम ससाणे, कॉ. नरेश दुगाणे, कॉ. विरेंद्र पद्मा, कॉ. वसीम मुल्ला, कॉ. पुष्पा पाटील, कॉ. विक्रम (मुन्ना) कलबुर्गी, कॉ. मुरलीधर सुंचू

 

मोठी घोषणा : 10 हजार महिला कामगारांचा पायी मोर्चा

समारोपीय भाषणात जिल्हाध्यक्ष कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली.
ते म्हणाले,
“विडी कामगारांना किमान वेतन 402 रुपये, 10 हजार रुपये पेन्शन, रोख मजुरी, तसेच कॉ. गोदूताई परुळेकर वसाहतीतील मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 10 हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मंत्रालय (मुंबई) असा पायी मोर्चा 14 एप्रिल 2026 रोजी काढण्यात येईल.”

सरकार कामगारांना गुलाम बनवणारे नवे कायदे आणत आहे आणि सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून भांडवलदारांना लाभ देत असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर संघर्षाची हाक दिली.

अधिवेशनात मंजूर झालेले 8 ठराव

1. विडी कामगारांचे सुधारित किमान वेतन रु. 402 फरकासहित अदा करा व निवृत्त कामगारांना रु. 10,000 पेन्शन द्या.
2. यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा.
3. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा.
4. जन सुरक्षा कायदा रद्द करा.
5. शहराला दररोज पाणीपुरवठा करा.
6. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या व किमान वेतन लागू करा.
7. कॉ. गोदूताई परुळेकर वसाहतीतील पायाभूत सुविधा उपलब्ध करा.
8. नवीन रे नगर परिसरात रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button