भाजपच्या आखाड्यात पुणे शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या प्रचाराचा धूमधडाका
जुळे सोलापूर येथील वि. मो. मेहता हायस्कूलमध्ये प्रचारसभा; शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आवाहन

सोलापूर :
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर यांच्या प्रचाराला वेग आला असून, सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरातील वि. मो. मेहता हायस्कूल येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील नामवंत शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्था कार्यरत असून, तिच्या माध्यमातून सोलापूरमध्येही विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. सुरेश बाबू मंकणी यांच्या उपस्थितीत ही प्रचारसभा पार पडली. पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. डॉ. बी. पी. रोंगे हे सुरेश बाबू मंकणी यांचे निकटवर्तीय सहकारी, जिव्हाळ्याचे मित्र आणि खंदे समर्थक असल्याने त्यांच्या प्रचारासाठी शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.

शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आवाहन
सभेदरम्यान सुरेश बाबू मंकणी यांनी शिक्षकांना संबोधित करताना प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर हे शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या शासनदरबारी मांडण्याचा तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांना आपल्या दैनंदिन कामकाजात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि त्यांच्यासाठी प्रभावीपणे आवाज उठवणारा प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस कार्यवाही व्हावी, यासाठी योग्य प्रतिनिधीला पाठबळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या पाठीशी शिक्षकांनी ठामपणे उभे राहावे आणि त्यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बहुमोल मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन
शिक्षक मतदारांनी मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपले बहुमोल मत योग्य उमेदवाराला देऊन शिक्षकांच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन सभेत करण्यात आले. संस्थेचा पाठिंबा आणि शिक्षकांचे सहकार्य मिळाल्यास प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर शिक्षकांच्या विविध समस्या प्रभावीपणे मांडू शकतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
शिक्षकांची उपस्थिती; निवडणुकीकडे लक्ष
या प्रचारसभेला मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सभेदरम्यान शिक्षकांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षकांच्या प्रश्नांवर कोणता उमेदवार प्रभावी भूमिका मांडतो आणि त्यांच्या अपेक्षांना कोण न्याय देऊ शकतो, याबाबत शिक्षकवर्गात उत्सुकता असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक सक्रिय होत आहे. आगामी काळात उमेदवारांच्या प्रचारसभा, शिक्षकांशी संवाद आणि विविध प्रश्नांवरील भूमिका यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.
या सभेच्या माध्यमातून प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले असून, शिक्षक मतदारांचा अंतिम कौल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



